जोस बटलरच्या शानदार शतकाच्या बळावर इंग्लंडचा विजयाचा चौकार, इंग्लंडचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित

पहिल्या ३ सामन्यांत ३ विजय मिळवत इंग्लंडने टी-२० विश्वचषकाची शानदार सुरुवात केली होती त्यामुळे इंग्लंडचा संघ कामगिरीत सातत्य राखेल असेच दिसत होते. तर दुसरीकडे उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या आशा पल्लवीत ठेवण्यासाठी श्रीलंकेला विजय आवश्यक होता. श्रीलंका संघाचा कर्णधार दसुन शनाकाने नाणेफेक जिंकत इंग्लंड संघाला फंलंदाजीचे आमंत्रण दिले होते. दोन्ही संघांनी मागील सामन्यांतील संघच कायम ठेवला होता. सामना शारजाच्या मैदानावर होत असल्याने फलंदाजांची चांगलीच परीक्षा होती.

कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत श्रीलंकेच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या तगड्या फलंदाजीला सुरुंग लावत इंग्लंडची अवस्था ५.२ षटकांत ३ बाद ३५ केली होती. पॉवर प्ले मध्ये ३ गडी गमावल्यामुळे इंग्लंडचा संघ चांगलाच अडचणीत सापडला होता त्यामुळे जोस बटलर आणि कर्णधार इयॉन मॉर्गनने सावध पवित्रा घेतला होता. श्रीलंकेचे गोलंदाज वरचढ होताना दिसत होते आणि सहजासहजी धावा मिळत नव्हत्या. इंग्लंडने १२ षटकांत ३ बाद ६१ पर्यंत मजल मारली होती. इंग्लंडसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बटलर आणि मॉर्गन अजुनही मैदानात टिकुन होते. १३ व्या षटकांपासुन बटलर आणि मॉर्गनने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली होती. १४ व्या षटकांत बटलरने ४५ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. फॉर्मसाठी झगडत असणारा कर्णधार मॉर्गन देखिल जबरदस्त फटके खेळत होता. अर्धशतक साजरे केल्यानंतर बटलरने श्रीलंकेच्या सर्वच गोलंदाजांवर हल्ला चढवला होता. १५ षटकांत इंग्लंडने १०० धावांच टप्पा देखिल पार केला होता आणि बटलर व मॉर्गनची जोडी श्रीलंकेसाठी धोकादायक ठरताना दिसत होती. इंग्लंडचा संघ १४०-१५० पर्यंत मजल मारेल असे वाटत होते पण बटलरच्या नाबाद १०१ धावांच्या खेळीने संघाला १६३ धावांपर्यंत मजल मारुन दिली. इंग्लंडकडुन बटलरने नाबाद १०१ तर मॉर्गनने ४० धावांची खेळी केली. श्रीलंकेकडुन वानिंदु हसरंगाने ३ तर चमिराने १ गडी बाद केला.

१६४ धावांचा पाठलाग करण्यासाठी युवा श्रीलंका फलंदाजांकडुन चांगल्या सुरुवातीची अपेक्षआ होती पण एक चौरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात पहिल्याच षटकांत निसंका धावाबाद झाला. निसंकानंतर मैदानात आलेला असलंका चांगल्या लयीत दिसता होता पण तो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मोईन अलीकडे झेल देऊन माघारी परतला. असलंका पाठोपाठ कुसल परेरा देखिला माघारी परतला होता. ३४ धावांत ३ गडी गमावल्यामुळे श्रीलंकेचा संघ चागंलाच अडचणीत सापडला होता त्यामुळे अविष्का आणि राजपक्षेकडुन चांगल्या भागिदारीची अपेक्षा होती. राजपक्षेने काही प्रमाणात प्रतिकार केला पण तो वोक्सच्या  गोलंदाजीवर जेसन रॉयकडे झेल देऊन माघारी परतला तेव्हा श्रीलंकेची अवस्था १०.५ षटकांत ५ बाद ७६ झाली होती. आता श्रीलंकेची पुर्ण मदार होती ती कर्णधार दसुन शनाका आणि वानिंदु हसरंगावर होती. दोघांनी मोठे फटके खेळत ६ षटकांत ५३ धावांची भागिदारी करत संघाच्या आशा पल्लवित केल्या होत्या त्यातच लिविंगस्टोनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हसरंगा ३४ धावा काढुन माघारी परतला आणि पुढील ८ धावांत ४ गडी गमवत श्रीलंकेचा संघ १३७ धावांत संपुष्टात आला आणि इंग्लंडने २६ धावांनी विजय मिळवता सलग चौथा विजय मिळवत आपले उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. इंग्लंडकडुन आदिल राशिद, मोईन अली आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी २ तर लिविंगस्टोन आणि वोक्सने प्रत्येकी १ गडी बाद केला. इंग्लंडकडुन ६७ चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी करणाऱ्या जोस बटलरला सामनावीर पुरस्काराने गोरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी  

Leave a comment

Website Powered by WordPress.com.

Up ↑